सोमेश्वरची राजकीय धडधड वाढली..! शिफारशीवर नाही,तर मेरिटवरच ठरणार उमेदवारीचा गुलाल अन उमेदवारांची धाकधूक शिगेला..?
सोमेश्वरनगर
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या ऐन रंगात आली असून, उमेदवारी अर्जांच्या माघारीचा दिवस म्हणजेच ३० तारीख जशी जवळ येत आहे, तशी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राजकीय धडधड प्रचंड वाढली आहे. काही संचालकांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे प्रत्येक घडामोडीची सूक्ष्म नोंद घेतली जात आहे..!
उमेदवारांचा जीव टांगणीला
ऐकीव गोष्टींवर किंवा कोणाच्या सांगण्यावर अजिबात अवलंबून न राहता, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि त्यांचे कुटुंब स्वतः या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कोणाची पोहोच कुठपर्यंत आहे, कोणत्या नेत्याचा सभासदांवर प्रत्यक्ष प्रभाव आहे आणि कोणाचे ‘उपद्रव मूल्य’ किती असू शकते, याची खडान् खडा माहिती पक्षनेतृत्वाला आहे. ‘मेरिट’वर होणारी निवड यामुळे उमेदवारी मागणाऱ्या चा जीव सध्या चांगलाच टांगणीला लागला आहे..!
“ज्यांचा ऊस, त्यांनाच कारखान्याची तळमळ!” — सभासदांचा सूर
यावेळची निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी आणि भावनावश वातावरणात होत आहे. सामान्य सभासदांमधून मात्र अत्यंत स्पष्ट आणि रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “ज्यांचा कारखान्याला दरवर्षी तीन अंकी (कमीत कमी १०० टन किंवा त्याहून अधिक) ऊस जातो, त्यांनाच खऱ्या अर्थाने कारखान्याच्या हिताची आणि शेतकर्यांच्या घामाची तळमळ असू शकते,” असा सूर सभासदांमधून निघत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ऊस उत्पादक असलेल्या निष्ठावंत शेतकरी चेहऱ्यांनाच संधी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे..!
अजितदादांच्या पश्चात कसोटी, अध्यक्षाचा चेहरा निवडणुकीनंतरच..?
दादांच्या पश्चात होत असलेली ही निवडणूक सर्वच गटांसाठी प्रतिष्ठेची आणि कसोटीची ठरत आहे. त्यामुळे सभासद कोणत्याही भूलथापांना न बळी पडता, उमेदवार पाहूनच आपले अमूल्य मतदान करणार असल्याची चर्चा कार्यक्षेत्रात दबक्या आवाजात सुरू आहे. कदाचित,कारखान्याचा अध्यक्षपदाचा चेहरा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने आणि रणनीतिकदृष्ट्या लढवत आहे..!
३० तारखेला होणार ‘दूध का दूध, पाणी का पाणी’
सोमेश्वरच्या बहुतांश सभासदांचा कौल आणि अनुकूलता आजही स्व अजितदादांच्या गटाच्याच बाजूने असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आता ३० तारखेच्या अर्ज माघारीच्या दिवशी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणे ओस्तुक्याच ठरणार आहे. सोमेश्वर निवडणुकीकडे संपूर्ण तालुका आणि साखर पट्ट्याचे लक्ष लागून राहिले आहे.अशातच पार्थ पवार आणि जय पवार यांनी दुपारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट अन मार्गदर्शन घेतल्याचे समजते..!
