शरद पवार साहेबांच्या राजकारणाची पहिली पायरी आणि काकडे कुटुंबाची ६ दशकांची एकनिष्ठता,एका राजकीय प्रवासाची मार्मिक गाथा..!
निंबुत
बारामती तालुक्याच्या राजकारणात अनेक समीकरणे घडली आणि बदलली, पण काही नाती काळाच्या कसोटीवर कायम सोन्यासारखी चकाकली. या अशाच एका राजकीय व सामाजिक एकनिष्ठेचे दुसरे नाव म्हणजेच भगवानदादा काकडे कुटुंब!
साल १९६७. शरद पवार साहेबांनी जेव्हा आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला, तेव्हा बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात त्यांना भक्कम आधार देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व ठरले ते भगवानदादा काकडे. आज तब्बल साडेपाच ते सहा दशकांहून अधिक काळ (सुमारे ६० वर्षे) लोटला तरी हे कुटुंब पवार कुटुंबाशी तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जोडलेले आहे..!
राजकारणाची खडतर सुरुवात आणि निर्णायक साथ
शरद पवार साहेब जेव्हा १९६७ मध्ये राजकारणात पूर्णपणे नवखे होते, तेव्हा पूर्व भागात साहेबांचे प्राबल्य असले तरी पश्चिम भागाची खडतर भूमी त्यांच्यासाठी नवीन होती. अशा वेळी भगवानदादा काकडे यांनी दिलेली खंबीर साथ साहेबांच्या पहिल्यावहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत अत्यंत निर्णायक ठरली. हा तो काळ होता जेव्हा विचारांची बांधिलकी जपली जात होती आणि काकडे कुटुंबाने घेतलेली ही भूमिका या संपूर्ण भागाच्या राजकीय प्रवासाचा पाया ठरली..!
पिढ्यानपिढ्यांचा लोकसेवा आणि सहकार प्रवास
काकडे कुटुंबाने कधीही पदासाठी राजकारण केले नाही, परंतु जनतेने आणि पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी कायम प्रामाणिकपणे पार पाडली.
भगवानदादा काकडे यांनी पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य म्हणून तळागाळातील जनतेची सेवा केली.त्यांच्या सुकन्या पुष्पाताई जगताप यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून धुरा सांभाळली.ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर काकडे यांनी निंबुतचे सरपंचपद भूषवण्यासोबतच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ५ वर्षे महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसरे पुत्र प्रदीपकुमार काकडे हे वाहतूक संघटनेच्या स्थापनेपासून आजतागायत सोमेश्वर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहजत आहेत.तसेच प्रमोद काका काकडे यांनी ५ वर्षे कारखाना संचालक अन १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य, तसेच बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती म्हणून आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर राजकारणात वेगळा ठसा उमटवला..!
अडीच वर्षांच्या अपवादाचा काळ आणि अचल निष्ठा
या संपूर्ण प्रवासात मधला अवघ्या दोन-अडीच वर्षांचा एक छोटासा काळ वगळता, हे कुटुंब कायम शरद पवार साहेब, दिवंगत लोकनेते अजितदादा आणि आता सुनेत्राताई, पार्थदादा व जयदादा यांच्या पाठीशी अत्यंत निष्ठेने उभे राहिले आहे. तालुक्यात कदाचित हे एकमेव असे कुटुंब असेल जे इतक्या दीर्घकाळापासून (सुमारे ६० वर्षे) एकाच विचाराशी आणि कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले आहे..!
एकाच गोष्टीची खंत अन सभासदांची भावनिक साद!
गेल्या ६०-७० वर्षांच्या या खडतर आणि निष्ठेच्या प्रवासामध्ये काकडे कुटुंबाने पक्षवाढीसाठी योगदान दिले, परंतु सहकारातील एका सर्वोच्च पदाने (कारखान्याच्या अध्यक्षपदाने) या कुटुंबाला कायमच हुलकावणी दिली आहे..!
आज जिरायत असो किंवा बागायतभाग, येथील सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदांच्या मनात एकच भावना दाटून आली आहे—”ज्या कुटुंबाने हयातभर पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहून पक्ष आणि सहकार वाढवला, त्या कुटुंबाच्या वारसदाराला, विशेषतः प्रमोद काकांना या पदाची संधी मिळायलाच हवी.”
आता सुनेत्रावहिनी, पार्थदादा आणि जयदादा या जुन्या आणि निष्ठेच्या नात्याची दखल घेऊन प्रमोद काकांना न्याय देतील का? हीच आज बारामती तालुक्यातील प्रत्येक सुजाण सभासद नागरिकाच्या मनातील साद आहे..!
✍️चंद्रजित काकडे – श्री सोमेश्वर माझा
