कोहाळे बुद्रुक येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,चार जणांवर गुन्हा दाखल..!
वडगाव निंबाळकर
मौजे कोहाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील फॉरेस्ट परिसरात कठीणपुल ते लाटे रोडवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करत चार जणांना रंगेहात पकडले आहे..!
बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात विशाल उदयसिंह साळवे, आकाश संजय साळवे, मयुर महेंद्र अहिवळे आणि राहुल सुधाकर यादव (सर्व रा. वडगाव निंबाळकर) हे ‘१३ पानी’ जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹१,६५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व संशयितांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे..!
सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पन्हाळे, खांडेकर, खेडकर, चौधरी, येटाळे व धोत्रे यांनी ही कारवाई पार पाडली. हद्दीतील अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही अशीच कठोर आणि प्रभावी कारवाई सत्र सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे..!
