निरा-बारामती महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू-अज्ञात चालकावर गुन्हा दाखल..!
वडगाव निंबाळकर
निरा-बारामती राज्यमार्गावरील सोरटेवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. विकास सिताराम जगताप (वय ५४ वर्षे, रा. साळोबा वस्ती, मुरूम, ता. बारामती, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजून शेचाळीस मिनिटांच्या (२०:४६) सुमारास विकास जगताप हे सोरटेवाडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती बसस्टॉपजवळून पायी चालत जात होते. त्यावेळी करंजेपूल चौकाकडून वडगाव निंबाळकरच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच शरीराच्या इतर भागांनाही गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जगताप यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपचारासाठी वाघळवाडी येथील साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यानच रात्री ९:५८ वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे मुरूम आणि सोरटेवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे..!
या अपघातानंतर धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ व १७७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा कसून शोध सुरू असून, या घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करत आहेत..!
