वडगाव निंबाळकर पोलिसांचा चोरट्यांना दणका,दुचाकी चोरीप्रकरणी जिंतीच्या दोघांना अटक..!
वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून चोरी झालेली मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर येथील श्रवण रेस्टॉरंट अँड परमिट रूम बिअर बारसमोरील पार्किंगमधून अभिजित चंद्रकांत घोडके (रा. वडगाव निंबाळकर) यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. MH-42-AC-7749 अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेली होती. ही घटना ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री ११:३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गोपनीय माहिती व तपासाच्या आधारे अजिंक्य जितेंद्र मोरे (वय २०) आणि अक्षय जनार्दन कांबळे (वय ३१, दोघे रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस MH-42-AC-7749 आणि गुन्ह्यासाठी वापरलेली TVS स्टार सिटी मोटारसायकल क्र. MH-11-AQ-6593 असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सदर यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर (बकल नं. २०८८), पोलीस शिपाई आबा जाधव व पोलीस शिपाई नरेंद्र यादव यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत..!
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. तसेच हँडल लॉकसोबतच व्हील लॉक किंवा अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे..!
