अमेरिकेतही विठ्ठल नामाचा गजर! वाशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात आषाढी एकादशी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न..!
सिएटल, वाशिंग्टन (अमेरिका)
“ज्ञानबा तुकाराम…” आणि “विठ्ठल रुक्मिणी माता की जय…” च्या जयघोषाने नुकताच अमेरिकेतील वाशिंग्टन राज्यातील सिएटल (Seattle) शहर परिसर दुमदुमून गेला. सातसमुद्रापार राहूनही आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट जपणाऱ्या येथील वारीप्रेमी आणि भाविक भक्तांनी आषाढी एकादशी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली..!

या सोहळ्यात पारंपारिक वेशभूषेतील भाविक, भव्य दिंडी, ढोल-ताशांचा गजर, अभंगांची सुरेल साथ आणि लहान-मोठ्यांचा आनंद अशा अनेक मोहक दृश्यांनी सिएटलमध्ये प्रत्यक्ष पंढरपूरचेच रूप अवतरले होते..!
भव्य दिंडी व ढोल-ताशांचा गजरात आषाढी एकादशी सोहळ्याच्या वेळी भव्य दिंडी काढण्यात आली. भगव्या पताका हाती घेऊन पारंपरिक वेशभूषेत भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच वारीचा आनंद लुटला..! सुरेल भजन आणि अभंगवाणी अन भक्तांनी एकत्र जमून टाळ आणि मृदंगाच्या साथीने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत जनाबाईंच्या अभंगांचे गायन केले. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसपूर्ण झाला होता..!
Video ची लिंक 📽️👇https://www.instagram.com/reel/DbPmLWUoNFE/?igsh=MWoyeW4wOXVyZTd6bQ==
या प्रसंगी महिला नऊवारी व काठपदराच्या साडीत तर पुरुष धोतर, कुर्ता आणि वारकरी टोपी परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते. बालगोपालांनीही वारकऱ्यांचे रूप परिधान करून सर्वांचे मन जिंकले.यानिमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची मनमोहक पूजा व आरास करण्यात आली होती. आषाढी एकादशीनिमित्त उपस्थित सर्व भाविकांसाठी फराळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते..!

ढोल-ताशांच्या तालावर आणि भगव्या पताकांसह उत्साहात चाललेली सिएटलमधील भव्य दिंडी, टाळ-मृदंगाच्या साथीने रंगलेला सुरेल भजन व अभंग सोहळा, सिएटलमधील सुंदर विठ्ठल-रुक्मिणी पूजा, महाप्रसाद आणि वारकरी वेशातील भाविक..!
अमेरिकेसारख्या धावपळीच्या देशात आपल्या मातृभूमीची परंपरा, वारीची शिस्त आणि भक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला. सिएटलमधील या सोहळ्याने खऱ्या अर्थाने परदेशात पंढरीची वारी अवतरली होती..!
