हायवा-टिपर चोरणारी टोळी जेरबंद-वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!
बारामती/वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या हायवा टिपरचा छडा लावत पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत..!
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मुढाळे (ता. बारामती, जि. पुणे) येथील माळशिखारे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावरून दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८:०० ते २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजेच्या दरम्यान एक हायवे टिपर चोरीला गेला होता. या प्रकरणी २३ जुलै रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४६/२०२६, बी.एन.एस. कायदा कलम ३०३(२) अन्वये तक्रार नोंदवण्यात आली होती..!
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तातडीने तपासासाठी पथक रवाना केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.तपासादरम्यान, आरोपी वाळूंज एम.आय.डी.सी. (संभाजीनगर) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून टिपरसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले..!
अटक करण्यात आलेले आरोपी१.राहुल विठ्ठल कराळे (वय ३१ वर्षे, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर)२.आदित्य रमेश कराळे (वय २५ वर्षे, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर)पोलीस तपासात दोन्ही आरोपींनी मिळून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत पाटील करत आहेत..!
ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग)मा. गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती) मा. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते,पोलीस अंमलदार भागवत पाटील,महेश पन्हाळे,पोपट नाळे,अनिल खेडकर,ह्रदयनाथ देवकर, भाऊसाहेब मारकड,आबा जाधव,नरेंद्र यादव,सुरज धोत्रे,धनंजय भोसले आणि विकास येटाळे यांच्या पथकाने केली.
