ग्रामपंचायत निवडणुका, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय..!

0
1783677645146
Spread the love

बारामती
राज्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तूर्तास प्रसिद्ध करू नये, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचा सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे..!

राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जाणार होत्या, तर ४ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती..!

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – 2026) सुरू असल्याने, या कार्यक्रमास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती..

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून १७ जुलै २०२६ च्या पत्रान्वये विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी विनंती करण्यात आली होती..!

अपूर्ण तयारी हे प्रमुख कारण निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे १५,००० ग्रामपंचायतींपैकी अत्यंत मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या तयार झाल्याचे दिसून आले..!

जिल्हाधिकाऱ्यांची विनंती आणि प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेता, राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील सविस्तर सूचना आणि सुधारित मतदार यादी कार्यक्रम यथावकाश (योग्य वेळी) कळवला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed