पारंपरिक काकडे विरुद्ध पवार संघर्षाला पूर्णविराम. सोमेश्वरमध्ये आता ‘पवार विरुद्ध पवार’ रणसंग्राम..?
बारामती (विशेष प्रतिनिधी)
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उडणार आहे. दशकानुदशके चाललेला पारंपरिक काकडे विरुद्ध पवार संघर्ष आता मागे पडला असून, या निवडणुकीत थेट ‘पवार विरुद्ध पवार’ अशी रंगतदार लढाई पाहायला मिळणार आहे..!
गावागावच्या पारांवर चर्चेचा उधाण –
उमेदवारांच्या नावाबाबत अजूनही सस्पेन्स कायम असला, तरी सभासदांमध्ये मात्र वेगवेगळ्या समीकरणांची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक गावातील पारावर, हॉटेलच्या बाकावर आणि शेताच्या बांधावर आगामी नेतृत्वाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत..!
‘सोमेश्वर म्हणजे थेट प्रपंच…’ अजितदादांच्या आठवणीने सभासद भावूक.!”सहकारी साखर कारखाना म्हणजे केवळ राजकीय संस्था नसून तो थेट शेतकऱ्याच्या प्रपंचाशी निगडित असतो,” या स्व. अजितदादांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकेकाळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोमेश्वर कारखान्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक म्हणून उभारी देण्याचे काम अजितदादांनी केले. त्यांनी घेतलेले खंबीर निर्णय आणि दिलेले योगदान सभासद आजच्या घडीलाही विसरलेले नाहीत. कारखाना परिसरात आणि सभासदांमध्ये दादांच्या आठवणीने अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले आहे..!
दादांच्या गटाचे पारडे जड-
विरोधक सक्षम उमेदवारांच्या शोधात ? मागील ३४ वर्षांपासून अजितदादांनी ज्या उमेदवारांवर विश्वास दाखवला, त्यांना सभासदांनी नेहमीच भरभरून मतांनी निवडून दिले आहे. यावेळी दादांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत धुरंधर रणनीती आखत निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. दादांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आणि समर्थानामुळे अजितदादा गटाचे पारडे निश्चितच जड दिसत असून, इच्छुकांची गर्दीही याच गटात सर्वाधिक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला, विरोधक कितीही टीका करत असले तरी त्यांच्याकडे या रणनीतीसमोर सक्षम उमेदवार उभा करण्याचे मोठे आव्हान असून ते यात अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.येणारा काळच ठरवेल की सोमेश्वरचे सभासद नक्की कोणाच्या मागे ठामपणे उभे राहतात; परंतु दादांच्या ऋणात राहिलेला सभासदवर्ग या निवडणुकीतही दादांच्या विचार आणि रणनीतीलाच साथ देईल,अशीच चिन्हे सध्यातरी दिसत आहेत..!
