वडगाव निंबाळकर पोलिसांची शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील, पानदुकानावर ४ ठिकाणी कायदेशीर कारवाई..!

0
Screenshot_20260904_094304_WhatsAppBusiness
Spread the love

वडगाव निंबाळकर, ता. ४
शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने काल (दि. ३) विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या चार जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत..!

काल दुपारी १६:०० ते १८:०० या वेळेत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर विक्री केंद्रांची कसून तपासणी केली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करून शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ४ ठिकाणी विक्रेत्यांवर ‘सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम, २००३’ (COTPA Act) नुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित ठिकाणांहून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत..!


शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात अशा पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने कायद्याने यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्याचे पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले..!

पोलिसांचे नागरिकांना आवाहन –
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन आणि दुकानदारांना शाळा-महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य व आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed