वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई. हातभट्टी दारूविक्री करणाऱ्या महिला आरोपीला अटक, थेट येरवडा कारागृहात रवानगी..!
वडगांव निंबाळकर
हातभट्टीची गावठी दारू अवैधरित्या बाळगून विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपीला अटकच केली नाही, तर तिला थेट येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अन्वये कारवाई करण्यात आली असून, या कलमांतर्गत १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची कठोर शिक्षेची तरतूद आहे..!
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे निंबुत (ता. बारामती) गावाच्या हद्दीत, ओढ्याजवळ एका पत्र्याच्या आडोशाने हातभट्टीची गावठी दारू विक्री सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धडक कारवाई केली..!
या कारवाईदरम्यान, कोमल प्रमोद नवले रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे ही महिला आरोपी घटनास्थळी हातभट्टीची दारू विकताना रंगेहाथ आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडून २५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू अंदाजे किंमत २,५०० रुपये आणि २,१२० रुपये रोख रक्कम असा एकूण ४,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..!
कारवाई सुरू असताना पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर महिला आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत व कसून शोध घेऊन अवघ्या काही वेळातच आरोपी महिलाचा शोध लावला आणि तिला बेड्या ठोकल्या. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे..!
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७०/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ नुसार या गुन्ह्यात १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची कठोर शिक्षा होऊ शकते..!
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिपक वारुळे करीत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत..!
