खाकी वर्दीआडचे हळवे नाते,वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये रंगला रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा..!

0
IMG-20260902-WA0004
Spread the love

वडगांव निंबाळकर
“आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही अहोरात्र रस्त्यावर पहारा देता, आम्ही त्या भावांना ओवाळून रक्षाबंधन साजरी करणार” असाच काहीसा भावनिक आणि भारलेला माहोल वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाला. निमित्त होते भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाचे..!

“रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यांवर अपार,
त्या खाकी वर्दीतल्या भावासाठी अशी रक्षाबंधन हजार…”

अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी आणि रक्षणासाठी आपले कुटुंब, सण-उत्सव बाजूला सारून अहोरात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी हा दिवस अत्यंत जिव्हाळ्याचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. ज्योतीताई लडकत यांच्यासह सौ. पूजा गणेश जगताप, सौ. मीना दशरथ जगताप, सौ. शोभा गोरख जगताप, सौ. राणी बजरंग जाधव आणि सौ. हेमा गणेश खोडके यांनी पोलीस स्टेशनला आवर्जून सदिच्छा भेट दिली..!

यावेळी महिलांनी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिपक वारुळे यांच्यासह संपूर्ण पोलीस स्टाफमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. ओवाळणीनंतर जेव्हा पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी सजली, तेव्हा कर्तव्यात कठोर असणाऱ्या खाकी वर्दीआडचे एक हळवे आणि आनंदी रूप पाहायला मिळाले. अनेक दिवसांपासून कुटुंबापासून लांब राहून सण साजरा करणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर या भगिनींच्या प्रेमाने आत्मीयतेचे आणि समाधानाचे हास्य फुलले..!

या अनोख्या आणि कौतुकास्पद सोहळ्यामुळे पोलीस स्टेशनमधील तणावपूर्ण आणि धावपळीचे वातावरण काही क्षणांसाठी पूर्णपणे बदलून गेले. स्नेह आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणामुळे पोलीस बांधव भारावून गेले, समाजसेवेचे व्रत अधिक जोमाने पार पाडण्यासाठी या ओवाळणीने आपल्याला नवी ऊर्जा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed