वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई,अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम जेरबंद..!
बारामती
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे..!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कायदेशीर पावले उचलली..!
याप्रकरणी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे वाढते प्रकार पाहता हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जात आहे..!
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने सूत्रे हलवली. सुरज विनायक भोसले (रा. तरडोली, तालुका बारामती, जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत..!
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका घेतली जात असून या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे..!
