मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, १८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी..!
महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून, सर्व पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याचे व दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..!
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत- सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी गणना अर्ज भरून व त्यावर स्वाक्षरी करून, गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) देणे आवश्यक आहे. १७ ऑगस्ट २०२६ गणना अर्ज भरून दिलेल्या मतदारांची नावे समाविष्ट असलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल..!
१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ (दावे व हरकतीचा कालावधी) ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत नसेल किंवा जे नवीन मतदार आहेत, ते नमुना ६ (सोबतच्या घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह) भरून अर्ज करू शकतात. नोंदणीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरावा लागेल.यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत घेता येईल…!
१९ ऑक्टोबर २०२६ अर्ज पडताळणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाईमतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना जर कोणी चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार १ वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात.अंतिम यादीनंतरही निरंतर नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध असणार आहे.लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ मधील तरतुदीनुसार, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करणे शक्य आहे.ही एक निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे..!
कलम २३ (३) नुसार कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत नमुना क्र. ६ मध्ये अर्ज करून पात्र व्यक्ती आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
