आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तयार केलेल्या वाल्हे-परिंचे रस्त्याची दुर्दशा; सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्या चोरीला जाण्याची भीती..!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष,नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी | शासनाच्या मालमत्ता चोरांना केंद्रीय रेल्वेप्रमाणे कठोर शिक्षेची गरज..!
वाल्हे / परिंचे
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने लक्षावधी रुपये खर्च करून वाल्हे ते परिंचे दरम्यान अत्यंत दर्जेदार आणि सुंदर रस्ता तयार करण्यात आला होता. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या, स्थानिक नागरिकांच्या व खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तसेच अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे (गार्ड रेल्स) आणि लोखंडी फॅन्सिंग/सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज या सुंदर रस्त्याची जागोजागी दुर्दशा झाली असून सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्या उखडून रस्त्यावर लोळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे..!
वाल्हे ते परिंचे मार्गावर अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्या खांबांवरून उखडून थेट रस्त्यावर पडल्या आहेत..!
अशा प्रकारे उघड्या व निराधारासारख्या पडलेल्या या महागड्या लोखंडी व प्लास्टिक कोटेड जाळ्या चोरट्यांचे सोपे सावज ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे..!
रस्त्याच्या कडेला लोंबकाळणाऱ्या आणि डांबरी रस्त्यावर पसरलेल्या या जाळ्यांमुळे रात्रीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांचे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढला आहे..!
लाखो रुपयांचा महसूल आणि सरकारी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या पायाभूत सुविधांची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) आहे. मात्र, जाळ्या उखडून पडल्या असल्या तरी संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने याकडे साधे लक्षही दिलेले नाही. या निष्काळजीपणामुळे नागरिक आणि वाहनधारकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे..!
सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे अथवा चोरी करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या धर्तीवर (रेल्वे मालमत्ता बेकायदेशीर ताबा कायदा) रेल्वेच्या साहित्याची चोरी करणाऱ्यांना जशी अजामीनपात्र व कठोर शिक्षेची तरतूद आहे, तशीच कडक नियमावली राज्य शासनाने रस्त्यांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्या, दुभाजक व इतर साहित्याच्या चोरीबाबत करणे गरजेचे आहे. अशा चोरांना कडक शिक्षा झाल्यासच सरकारी मालमत्तेची लुटालूट थांबेल, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे..!
सुंदर रस्त्याची जागोजागी झालेली दुर्दशा थांबवून, उखडलेल्या सर्व सुरक्षा जाळ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच प्रशासनाची गस्त वाढवून सरकारी साहित्याची चोरी करणाऱ्या व नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे..!
