पुरंदरचे ‘छोटे महाबळेश्वर’ – दुर्लक्षित ‘काळदरी’ गावाला निसर्गप्रेमींची पसंती, इंद्रनील पर्वतरांगेतील निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालणारे..!

0
IMG-20260801-WA0010
Spread the love

सासवड
सामान्यतः कमी पर्जन्यमानाचा आणि दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्याचा दक्षिण भाग सध्या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराने बहरला आहे. पौराणिक संदर्भानुसार ‘इंद्रनील पर्वतरांग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये वसलेले ‘काळदरी’ हे छोटेसे गाव आतापर्यंत पर्यटनाच्या नकाशावर काहीसे दुर्लक्षित राहिले होते. मात्र, येथील निसर्गरम्य वातावरण, लहान-मोठे धबधबे आणि प्रवाहित होणारे ओढे-नाले यामुळे हे गाव सध्या निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे..!

सासवडहून पानवाडी घाटमार्गे कालदरी गावाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवळ आणि धुक्याची शाल पर्यटकांचे मन मोहून टाकते. या घाटातून प्रवास करताना आपण पुरंदर तालुक्यात आहोत की एखाद्या कोकणातील किंवा महाबळेश्वरच्या निसर्गरम्य ठिकाणी, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. पुरंदरचा हा दक्षिण भाग निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे..!

मोबाईल कनेक्टिव्हिटीपासून दूर अन निसर्गाच्या अतिशय जवळ घेऊन जाणारे गाव म्हणून नवी ओळख.
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात निवांतपणा शोधणाऱ्यांसाठी कालदरी हे उत्तम ठिकाण आहे. या परिसरात मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा नेटवर्क अतिशय कमी असल्यामुळे पर्यटकांना डिजिटल दुनियेपासून दूर राहून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.
खळाळणारे ओढे, हिरवेगार डोंगर आणि त्यावरून कोसळणारे छोटे-छोटे धबधबे यांचा विलोभनीय नजारा मनाला भुरळ पाडतो. या निसर्गरम्य वातावरणाचा अद्भुत नजारा आणि अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्कीच घेतला पाहिजे. शहराच्या गजबजाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात काढलेले क्षण आणि या ठिकाणच्या आठवणी पर्यटकांच्या हृदयात कायमस्वरूपी साठवून राहतील अशाच आहेत..!

निसर्गाचे अनोखे रूप अनुभवण्यासाठी पर्यटकांनी काळदरी गावाला आयुष्यात एकदा तरी आवर्जून भेट द्यावी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed