वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई,बनावट पोलीस सांगून खंडणी उकळणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या..!
वाघळवाडी/बारामती –
पोलीस प्रशासनाशी संबंध असल्याचे सांगत एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व अटकेची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या भामट्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. विनोद मारुती नामदास (रा. विकासनगर, वाणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिर्यादी विजय हिंदुराव साळुंखे (वय ३६ वर्षे, रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी विनोद नामदास याने फिर्यादी साळुंखे यांना “तुमच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला पोलीस अटक करतील,” अशी भीती दाखवली. तसेच स्वतःचे पोलिसांशी जवळचे संबंध असल्याचे खोटे भासवून अटकेपासून वाचवण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून तब्बल १२,००० रुपयांची खंडणी उकळली.एवढ्यावरच न थांबता, आरोपीने फिर्यादीकडे पुन्हा अधिक रक्कमेची मागणी करत धमकावून अधिक खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक आणि पिळवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी साळुंखे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली..!
फिर्यादीच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(६)(७), ३५१(२)(३) आणि ३१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी विनोद नामदास याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपोसई वारुळे करत आहेत..!
