वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई,अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक, येरवडा कारागृहात रवानगी..!
बारामती / वडगाव निंबाळकर
लग्नाचे आमिष दाखवून आणि घर बांधून देण्याचे प्रलोभन देऊन एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अक्षय नामदेव गुळुमकर ( रा. कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीची येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे..!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय गुळुमकर याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच ‘तुझ्या आईला मी घर बांधून देतो’ असे प्रलोभन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला. यासोबतच पीडितेस धमकी देऊन मानसिक त्रासही दिला. याप्रकरणी पीडितेच्या वतीने प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता..!
आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६८, ७४, ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियम कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत (JC) रवानगी केली असून, त्यानुसार त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे..!
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) राहुल साबळे करत आहेत..!
