इतिहास आणि भाषेचा रंजक प्रवास, ‘सप्तसिंधू’ ते ‘इंडिया’ नावाचा उगम..!

0
Screenshot_20260719_192159_Google
Spread the love

समृद्ध इतिहास

आज आपण ज्या देशाला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या नावांनी ओळखतो, त्या नावांचा इतिहास हजारो वर्षे जुना असून तो एका अत्यंत रंजक भाषिक प्रवासाशी जोडलेला आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातून सुरू झालेला हा प्रवास ग्रीक आणि अरब संस्कृतींमधून जात अखेर ‘इंडिया’ या नावावर येऊन कसा पोहोचला, याचा रंजक इतिहास जाणून घेऊयात..!

१. ‘सप्तसिंधू’ प्रदेश – संस्कृतीची सुरुवात
प्राचीन काळात, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात झाली.जगातील सर्वात जुनी आणि प्रगत अशी ‘सिंधू संस्कृती’ (Indus Valley Civilization) उदयास आली. या प्रदेशात प्रमुख सात नद्या वाहत असल्याने ऋग्वेदिक काळात या भूभागाला ‘सप्तसिंधू’ (सात नद्यांचा प्रदेश) असे म्हटले जायचे. यामध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती (जी आता लुप्त झाली आहे) या नद्यांचा समावेश होता..!

२. पर्शियन आणि अरब देशांतील उच्चार – ‘सप्तसिंधू’चे झाले ‘हप्तहिन्दू’
काळानुरूप भारताचा पश्चिमेकडील देशांशी व्यापार आणि संबंध वाढले. प्राचीन पर्शियन (इराणी) आणि अरब देशांतील लोकांच्या भाषेमध्ये ‘स’ या अक्षराचा उच्चार ‘ह’ असा केला जाई. त्यामुळे जेव्हा त्यांनी ‘सप्तसिंधू’ या शब्दाचा उच्चार केला, तेव्हा तो ‘हप्तहिन्दू’ असा झाला. याच ‘हिन्दू’ शब्दावरून पुढे या भूभागाला आणि येथील राहणाऱ्या लोकांना ‘हिंदुस्थान’ किंवा ‘हिंदू’ ही ओळख मिळाली, जी धार्मिक नसून भौगोलिक ओळख होती..!

३. ‘इंडोस’चा उदय
हा शब्द जेव्हा पुढे ग्रीक (यूनानी) संस्कृतीमध्ये पोहोचला, तेव्हा तिथे एक वेगळाच भाषिक बदल झाला. प्राचीन ग्रीक भाषेच्या शब्दकोशात किंवा उच्चारपद्धतीत ‘ह’ (h) या ध्वनीचा अभाव होता किंवा ते त्याचा स्पष्ट उच्चार करत नसत.
त्यामुळे ग्रीक लोकांनी ‘हिन्दू’ किंवा ‘सिंधू’ मधील ‘ह’ किंवा ‘स’ गाळून त्याचा उच्चार ‘इंडोस’ (Indos) असा करण्यास सुरुवात केली. त्यांनी सिंधू नदीला ‘इंडस’ (Indus) असे नाव दिले आणि या नदीच्या पलीकडील संपूर्ण भूप्रदेशाला ‘इंडोस’ म्हणून संबोधू लागले..!

४. ‘इंडोस’ ते ‘इंडिया’
ग्रीक लोकांनी सुरू केलेला हा ‘इंडस’ आणि ‘इंडोस’ शब्द पुढे रोमन साम्राज्यात आणि लॅटिन भाषेमध्ये गेला. लॅटिन भाषेच्या प्रभावामुळे ‘इंडोस’ या शब्दाचे रूपांतर इंडिया’ (India) मध्ये झाले. ब्रिटिश कालखंडात हा शब्द अधिकृतपणे जगभर पसरला आणि आज आधुनिक जगात आपल्या देशाची ती एक प्रमुख ओळख बनली आहे..!

(जे ‘सिंधू’ होते, ते अरबांसाठी ‘हिंदू’ झाले, ग्रीकांसाठी ‘इंडस’ झाले आणि त्यातूनच पुढे ‘इंडिया’ या नावाचा जन्म झाला. हा प्रवास केवळ भौगोलिक बदल दाखवत नाही, तर जगातील वेगवेगळ्या संस्कृती कशा एकमेकांशी जोडल्या गेल्या होत्या, याचे उत्तम उदाहरण आहे..!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed