सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवणे आता सोपे – पुणे ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना विशेष मार्गदर्शन..!
प्रतिनिधी…
ऑनलाइन सायबर फसवणूक (Cyber Fraud) झाल्यास घाबरून न जाता, आपले कष्टाचे पैसे कायदेशीर मार्गाने परत मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे. सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे नागरिकांसाठी एक विशेष मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये फसवणूक झाल्यास काय करावे आणि पैसे कसे परत मिळवावे, याची सविस्तर प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे..!
१. फसवणूक झाल्यास त्वरित काय करावे?
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक झाल्यानंतरच्या पहिल्या १ तासाला गोल्डन अवर’ (Golden Hours) म्हटले जाते. या वेळेत तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.
तात्काळ संपर्क: फसवणूक होताच त्वरित १९३० (1930) या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवा.
तक्रार क्रमांक:तक्रार नोंदवल्यानंतर मिळणारा १४-अंकी तक्रार क्रमांक (Complaint ID) सुरक्षित ठेवून घ्या.
२. ऑनलाईन रिफंड अर्ज प्रक्रिया (MRM Portal)
तक्रार नोंदवल्यानंतर (Post Complaint Registration), जर पैसे सायबर गुन्हेगारांनी आधीच काढले नसतील, तर ऑनलाइन रिफंड मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
- सर्वप्रथम mrm-ncrp.mha.gov.इन या संकेतस्थळाला भेट द्या.
- तुमचा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला OTP वापरून Citizen Login करा.
- ‘Raise Refund Request’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा १४-अंकी Complaint ID टाका.
- पॅन कार्ड (PAN Card) अपलोड करा आणि तुमचे बँक डिटेल्स (बँक खाते तपशील) अचूक भरा.
- घोषणापत्र (Declaration) टिक करून Submit करा. त्यानंतर तुम्हाला Request ID प्राप्त होईल.(टीप: जर पैसे आधीच काढले गेले असतील तर रिफंड मिळणे कठीण होते, म्हणूनच त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे).
३. गोठवलेल्या रकमेची श्रेणी आणि पुढील कायदेशीर कारवाई
सायबर पोलिसांनी बँक खात्यात गोठवलेल्या (Freeze केलेल्या) रकमेनुसार पुढील कायदेशीर कारवाई तीन मुख्य श्रेण्यांमध्ये (Categories) विभागली आहे:
श्रेणी १ (₹ ५०,००० पर्यंतच्या रकमेसाठी):
यासाठी FIR किंवा कोर्ट ऑर्डरची गरज भासत नाही.
श्रेणी २ (प्रत्येक खात्यात ₹ ५०,००० पेक्षा कमी रकमेसाठी): यासाठीही FIR किंवा कोर्ट ऑर्डरची आवश्यकता नसते.
श्रेणी ३. (एकाच खात्यात ₹ ५०,००० पेक्षा जास्त रकमेसाठी): अशा प्रकरणांमध्ये FIR (गुन्हा) नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.
४. अंतिम टप्पा – पैसे मूळ बँक खात्यात जमा होणार
वरील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सायबर पोलीस टीममार्फत BNSS 106 (3)अन्वये रीतसर कायदेशीर कारवाई केली जाते. या कारवाईनंतर संबंधित बँक तुमच्या मूळ खात्यात फसवणूक झालेली रक्कम यशस्वीरित्या जमा (Restore) करेल आणि तुमचे पैसे तुम्हाला सुरक्षितपणे परत मिळतील..!
पुणे ग्रामीण पोलिसांचे आवाहन:
सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणालाही ओटीपी शेअर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सतर्क होऊन पोलिसांशी संपर्क साधा..!
