सोमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये ‘आनंदाची वारी’ उत्साहात संपन्न; बालचमूंचा अभूतपूर्व उत्साह..!
सोमेश्वरनगर
आषाढी एकादशीचे औचित्य साधून सोमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये बालचमूंची ‘आनंदाची वारी’ मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. नेहमी पाठीवर दप्तराचे ओझे वाहणारे चिमुरडे आज विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीत दंग झाले होते. या वारीने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता..!
विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपातील बालचमूंनी वेधले लक्ष -सोमेश्वर पब्लिक स्कूलचे प्रांगण आज पंढरपूरनगरी बनले होते. पारंपरिक पोशाखात, कपाळावर बुक्का आणि चंदनाचा टिळा लावून, हातात टाळ-मृदंग आणि खांद्यावर भगव्या पताका घेतलेले चिमुरडे वारकरी अत्यंत आकर्षक दिसत होते. काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची हुबेहूब रूपे साकारली होती. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जयु हरी विठ्ठल’ च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते..!
या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन शाळेच्या प्रिन्सिपल यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी मिस आणि सर यांनी केले. वारीदरम्यान शिस्त राखणे आणि विद्यार्थ्यांकडून अभंग, भजने म्हणून घेण्यात शिक्षिका आणि शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना वारीच्या मार्गावर सांभाळणे, त्यांना पाणी देणे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात शाळेचे मामा आणि बाई यांनी मोलाचे सहकार्य केले.पुढील पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची आणि वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यात भक्ती व शिस्तीचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने या ‘आनंदाच्या वारी’चे आयोजन करण्यात आले होते..!
