बारामती तालुक्यात निंबुत मध्ये संत सोपानकाका पालखीचे अनोख्या जल्लोषात स्वागत..!
निंबुत (बारामती)
विठू माऊलीच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या अखंड हरिनामाच्या जयघोषात, संत सोपानदेव महाराज (सोपानकाका) यांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील निंबुत येथे रात्रीच्या मुक्कामासाठी दाखल झाला आहे. पालखीचे गावात आगमन होताच निंबुत ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत अभूतपूर्व आणि अनोख्या जल्लोषात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले..!
पालखी सोहळा निंबुत नगरीत दाखल झाल्यानंतर गावातील प्रमुख मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी पालखी रथाचे मनोभावे पूजन केले. यामध्ये माजी बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे, माजी चेअरमन शहाजीकाका काकडे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप,उपसरपंच अमरभैय्या काकडे,गौतमभैय्या काकडे,उदय काकडे,महेश काकडे,इंद्रजित काकडे,अमोल बनसोडे, विजयनाना लकडे, जगन्नाथ जमदाडे यांच्यासाह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थांनी उपस्थित राहून सोपानकाकांच्या पालखीचे भव्य स्वागत केले..!
बा. सा. काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले पारंपरिक सादरीकरण. त्यांच्या उत्साहाने, ढोल, लेझीम आणि संभळाच्या निनादाने संपूर्ण निंबुत परिसर भक्तीमय बनला होता. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक केले..!
पालखी आज रात्री निंबुत येथे मुक्कामी असल्याने संपूर्ण गावात भक्तीचे वातावरण आहे. रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून, मुक्कामाच्या ठिकाणी सुंदर फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. गावाने मुक्कामी आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था केली आहे. प्रत्येक घरातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरिक पुढे आले आहेत..!
पालखी मुक्कामी दाखल झाल्यानंतर आता रात्री उशिरापर्यंत सोपानकाकांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, ठिकठिकाणी वारकऱ्यांची भजने आणि कीर्तने रंगत आहेत.!.
