छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगला शौर्य आणि संकल्पतेचा महासंगम, IAS अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहन..! ५ कल्याणकारी उपक्रमांद्वारे समाज परिवर्तनाची नांदी..!

0
58179fbc-b8b6-47d6-896e-3c59b44890e2_933DFEBF-975B-4A16-B7A2-481CA2D7016A
Spread the love

छत्रपती संभाजीनगर

इतिहासाच्या गौरवशाली पाऊलखुणा जपत जेव्हा एखादा समाज एकत्र येतो, तेव्हा केवळ इतिहास जागा होत नाही, तर एका उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते. याचाच प्रत्यय नुकताच छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमला कार्यालयात आला. निमित्त होते, अखंड मराठा काकडे परिवाराच्या पहिल्या ऐतिहासिक राज्यव्यापी बैठकीचे – महाराष्ट्रभरातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा पाचही विभागांमधील तब्बल ११७ गावांतून आलेल्या हजारो बांधवांच्या उपस्थितीने हा सोहळा अभूतपूर्व ठरला..!

सूर्याजींच्या रक्तातील शौर्यच आपले भविष्य घडवेल..!

या ऐतिहासिक परिषदेचे मुख्य आकर्षण ठरले ते महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस (IAS) अशोक काकडे यांचे विचारप्रवर्तक संबोधन. समाजाला त्यांच्या दैदिप्यमान शौर्यवारशाची आठवण करून देताना ते म्हणाले “सरदार सूर्याजी काकडे हे केवळ नाव नाही, तर स्वराज्यरक्षणाचा तो धगधगता इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत निकटच्या सहवासात राहून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी संघर्ष केला. ज्या कुळाला इतका पराक्रमी भूतकाळ लाभला आहे, त्याचे भविष्य नक्कीच प्रगतीशील आणि उत्कृष्ट असायला हवे. आता आपल्याला या शौर्यवारशाचे रूपांतर आधुनिक प्रगतीमध्ये करायचे आहे..!

*ऐतिहासिक ठराव: पांगारे आणि साल्हेरचा कायापालट होणार*..!

या बैठकीत केवळ चर्चा झाली नाही, तर समाजहिताचे मोठे निर्णय घेण्यात आले. परिवाराच्या वतीने दोन अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले- सरदार सूर्याजी काकडे यांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर (जि. पुणे) येथील ‘पांगारे’ या भूमीचा ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून भव्य विकास केला जाईल. नाशिक जिल्ह्यातील साल्हेरगड येथे असलेल्या त्यांच्या पवित्र समाधीस्थळाचा विकास करून, दरवर्षी ९ फेब्रुवारीला साजरा होणारा ‘बलिदान दिवस’ अधिक व्यापक पातळीवर साजरा केला जाईल. हा दैदिप्यमान इतिहास डिजिटल व ग्रंथ स्वरूपात जतन करण्याचेही निश्चित झाले..!

काकडे परिवार विकास मंच’- प्रगतीची ५ नवी सूत्रेकेवळ इतिहासाचे गोडवे न गाता आजच्या तरुणांना सक्षम करण्यासाठी ‘काकडे परिवार विकास मंच’ स्थापन करण्यात आला असून, त्याद्वारे पुढील ५ महत्त्वपूर्ण क्रांतीकारी उपक्रम राबवले जाणार आहेत-

१. काकडे बिझनेस फोरम- समाजातील नवउद्योजकांना आर्थिक बळ आणि जागतिक बाजारपेठेची जोड देण्यासाठी एक मजबूत बिझनेस नेटवर्क.

२. करिअर मार्गदर्शन-तरुण पिढीला उच्च शिक्षण आणि प्रशासकीय सेवांमध्ये (MPSC/UPSC) यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

३. कौटुंबिक मदत निधी-वैद्यकीय आणीबाणी किंवा अचानक आलेल्या संकटात परिवारातील कोणत्याही घटकाला तात्काळ आर्थिक सुरक्षा देणे.

४. डिजिटल वैवाहिक समन्वय-बदलत्या काळानुरूप विवाह प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक आणि डिजिटल प्रणाली.

५. शौर्यगाथांचे दस्तऐवजीकरण-पूर्वजांच्या इतिहासाचे डिजिटल आणि पुस्तकी स्वरूपात जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे..!

एकीचे बळ आणि कौतुकाची थाप-

या महाबैठकीला विजय काकडे (संभाजीनगर),राहुल काकडे (निंबुत),उद्योजक सुरेंद्र काकडे, प्रा. सीताराम काकडे, उद्योजक दत्ता काकडे यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे, संजय पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले असंख्य मान्यवर उपस्थित होते.या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन केल्याबद्दल मुख्य समन्वयक सदार विजय काकडे यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तरुणांनी ‘सारथी’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत, या बैठकीने काकडे परिवाराच्या सामाजिक एकतेचा एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed