गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य अन् नियमांचा भंग; ७ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल..!
वडगांव निंबाळकर प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी दिलेल्या सूचना धाब्यावर बसवून डॉल्बीच्या तालावर अश्लील हावभाव व बिभस्त नृत्य करणे, तसेच नियमांचे उल्लंघन करणे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कलाकारांना चांगलेच महाग पडले आहे. बारामती तालुक्यातील माळशिकारेवाडी (कोहाळे बुद्रुक) येथे घडलेल्या या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास मतकर वस्ती, माळशिकारेवाडी येथे ‘श्री साई समर्थ तरुण मंडळ’ च्या गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत ट्रॅक्टर (क्र. MH 42 Q 2644) आणि ट्रॉलीमध्ये (क्र. MH 42 BS 2120) डॉल्बीच्या मोठ्या आवाजात महिला नृत्यांगणांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव, अंगविक्षेप आणि बिभस्त नृत्य सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जात होते..!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६८ अन्वये मंडळाच्या अध्यक्षांना आगाऊ नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिसीमधील सर्व निर्देशांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईचा बडगा उगारला..!
या प्रकरणी महिला नृत्यांगना राधा संग्राम घुले (वय २९), मिनाक्षी बापुराव रुपनवर (वय ३५), काजल नितीन शिंदे (वय २६, तिघी रा. लाकडी, ता. इंदापूर), डॉल्बी मालक रोहित हणमंत धुमाळ (रा. गोखळी, ता. फलटण) आणि मंडळाचे राहुल दिलीप माळशिकारे, दिपक सुभाष माळशिकारे व निखील जालिंदर माळशिकारे (तिघे रा. माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक, ता. बारामती) अशा एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता , २०२३ चे कलम २९६, २२३, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ११० व ११७ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करत आहेत..!
दरम्यान, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत व संस्कृतीला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने पार पाडावी, तसेच शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे..!
