आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत मॉकड्रिल..!
वडगांव निंबाळकर
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा तात्काळ व प्रभावीपणे सामना करण्याच्या दृष्टीने मॉकड्रिल घेण्यात आले.गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, गणेश विसर्जन मिरवणुका, वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणेचा जलद, समन्वयपूर्ण व ठोस प्रतिसाद राहावा, हा या मॉकड्रिलचा प्रमुख उद्देश होता.
मॉकड्रिलदरम्यान आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेणे, परिसर सुरक्षित करणे, गर्दीवर नियंत्रण मिळविणे व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा प्रत्यक्ष सराव केला.तसेच उपलब्ध पोलीस मनुष्यबळाचा योग्य वापर, घटनास्थळी बंदोबस्ताचे नियोजन आणि विविध पथकांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याची कार्यपद्धती तपासण्यात आली.कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी व कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखता यावी, यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे पूर्णपणे सज्ज व सतर्क असल्याचे या मॉकड्रिलच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.गणेशोत्सव काळात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे..!
सपोनि जीवन मोहिते
प्रभारी अधिकारी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
