सोमेश्वर ची निवडणूक चौरंगी होणार ? कार्यक्रम लागला, रंगत वाढली..!

0
1788628976171
Spread the love

सोमेश्वर नगर

बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर येथील सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक पार पडणार असून, या घोषणेमुळे तालुक्यातील सहकार वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २१ २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, याद्वारे निवडणुकीचा बिगुल या आधीच वाजला होता ..!

या निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदान आणि निकालापर्यंतचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांना ०७ सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता जाहीर केली जाईल. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी होईल, तर १६ सप्टेंबर २०२६ रोजी वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी १६ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ दुपारी ३:०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जाहीर केले जाईल..!

कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधींच्या विविध गटांसह महिला राखीव, अनु. जाती/जमाती, इतर मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष मागासवर्गीय प्रतिनिधी अशा एकूण २१ जागांसाठी हा चुरशीचा निवडणूक संग्राम रंगणार आहे. सर्व सविस्तर प्रक्रिया पार पडल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन ती पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकालाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे..!

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी काही नियम व शुल्क सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशन अर्जाचे शुल्क १०० रुपये असणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंतची अनामत ठेव जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राखीव मतदारसंघातील उमेदवारांना अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडणे अनिवार्य असून, या निवडणुकीसंदर्भातील अधिक व सविस्तर माहितीसाठी नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed