बारामतीची कन्या श्रावणी कुदळे ‘NEET २०२६’ परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम; देशात मुलींमध्ये पटकावला पहिला क्रमांक..!
बारामती
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या ‘नीट’ (NEET 2026) परीक्षेत बारामतीच्या कन्येने घवघवीत यश संपादन करत संपूर्ण देशात व राज्यात बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे. बारामतीची रहिवासी असलेल्या कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने या परीक्षेत अभूतपूर्व कामगिरी केली आहे..!
श्रावणीने एकूण ७२० गुणांपैकी तब्बल ७१० गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात मुला-मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही तिने आपल्या यशाचा डंका वाजवला असून संपूर्ण भारतात मुलींमध्ये तिने पहिला क्रमांक मिळवला आहे..!
तिच्या या दैदिप्यमान यशामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत तिने मिळवलेले गुण आणि मिळवलेला क्रमांक हा राज्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे.या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. तिच्या या यशात तिची मेहनत, जिद्द आणि तिला मिळालेले योग्य मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा..!
