पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोदकाका काकडे यांचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल..!
बारामती (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व प्रमोदकाका काकडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीमुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात राजकीय चर्चांना उधाण आले असून, कारखाना निवडणुकीची रंगत वाढली आहे..!
प्रमोदकाका काकडे यांचा सहकार आणि राजकारणातील प्रवास अत्यंत व्यापक आहे. त्यांनी सर्वप्रथम १९९६ ते २००२ या कालावधीत सोमेश्वर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिल्यानंतर, २००७ ते २०१२ आणि २०१७ ते २०२२ अशा दोन टर्ममध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली आहे. जिल्हा परिषदेत त्यांना बांधकाम आणि आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली होती..!
विशेषतः, आरोग्य सभापती पदाची जबाबदारी सांभाळत असताना जगभरात आलेल्या कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी आरोग्याशी संबंधित घेतलेले कठोर निर्णय आणि बजावलेली उत्तम भूमिका त्यांच्या कणखर नेतृत्वाची व कार्याची ठळक ओळख ठरली..!
फक्त राजकारण नव्हे तर समाजकारणातही नेहमी अग्रेसर असणाऱ्या प्रमोदकाकांचा बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोठा राजकीय दबदबा आहे. सर्वसामान्य नागरिकांना संकटसमयी कायम मदतीचा हात देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती असून, ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहेत. याशिवाय, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात स्व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत महत्त्वाची भूमिका बजावली होती..!
अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) सदस्यपदाची महत्त्वाची जबाबदारी श्री. प्रमोद काका काकडे यांना देऊन जनसेवेचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून जिल्ह्याचा सर्वसमावेशक, आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जातात व राबवली जातात.
या सर्व कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रमोद काका काकडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या या तळमळीमुळे आणि जनसंपर्कामुळे तळागळातील गरजू व वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष पोहोचले असून, अनेक लाभार्थ्यांना हक्काचा आधार आणि न्याय मिळाला आहे..!
बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी पुन्हा एकदा रिंगणात उतरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी अर्ज दाखल करताना राजवर्धन दादा शिंदे, अमर भैया काकडे, सतीशराव संकुंडे, निलेश शिंदे, दिग्विजय मगर, महेश शिंदे, दीपक शिंदे, आनंदराव खालाटे, शिवाजी दगडे, शरद फरांदे, बाळासाहेब सुर्यवंशी, आनंदराव लकडे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते..!
