विशेष ऐतिहासिक वृत्तांत…सायकलवरून शिवार फिरत उभा राहिलेला ‘सोमेश्वर’, महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक सोनेरी पान..!
श्री चंद्रजित काकडे
बारामती / सोमेश्वर नगर –
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा देणारा आणि बारामती, पुरंदर व फलटण-खंडाळा परिसराचा आर्थिक कणा मानला जाणारा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा केवळ एक कारखाना नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभा राहिलेला शेतकरी जिद्दीचा एक ऐतिहासिक स्तंभ आहे. १९६० च्या दशकात रोवलेले हे सहकाराचे रोपटे आज एका महावटवृक्षात रूपांतरित झाले आहे..!
प्रतिकूल परिस्थिती आणि ‘सायकल’वर जमवलेली शेतकर्यांची साथ –
१९६० च्या सुमारास बारामती, पुरंदर आणि शेजारील फलटण-खंडाळा या दुष्काळी व जिरायती भागातील शेतकर्यांचे जीवन अत्यंत कष्टाचे होते. पाणी आणि उत्पन्नाची साधने मर्यादित असताना, या भागाचा कायापालट करण्यासाठी स्व. मुगुटराव (आप्पा) काकडे, बाबालाल काकडे आणि त्यांच्या खंबीर सहकाऱ्यांनी उजाड माळरानावर एका सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न पाहिले..!
त्या काळात वाहतुकीची किंवा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नव्हती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घरोघरी प्रचार – मुगुटराव आप्पा काकडे, बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊन-पावसाची तमा न बाळगता चक्क सायकलवरून तीन तालुक्यांतील गावे अन् गावे पिंजून काढली.
शेअर्सचे संकलन – शेतकर्यांना सहकाराचे महत्त्व पटवून देत अगदी रुपया-रुपया जोडून कारखान्याचे भागभांडवल (Shares) गोळा केले.
- शेतकर्यांच्या घामातून आणि विश्वासातून या कारखान्याची भक्कम पायाभरणी झाली..! यशवंतराव चव्हाणांचे स्वागत आणि ते ऐतिहासिक पहिले ‘मोळीपूजन’ –
कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या गळीत हंगामाच्या ऐतिहासिक पहिल्या मोळीपूजनासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार व तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते..!
मुख्यमंत्री येणार म्हणून संपूर्ण परिसरात अभूतपूर्व उत्साह पसरला होता –
फुलांचा गालिचा, यशवंतराव चव्हाण यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडपासून ते थेट कारखान्याच्या मुख्य प्रांगणापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुगंधी फुलांचे ताटवे आणि फुलांचा गालिचा अंथरण्यात आला होता..!
भव्य पुष्पवृष्टी – गावोगावाहून आलेल्या हजारो शेतकरी आणि महिलांनी मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे अतिशय भव्य व अभूतपूर्व स्वागत केले.
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालेले ते मोळीपूजन सोमेश्वर परिसराच्या भविष्यातील समृद्धीची नांदी ठरले..!
याबरोबरच सभासदांची मुले शिकली पाहिजेत ही दूरदृष्टी ठेऊन सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. यामध्ये सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वर पब्लिक स्कूल( ही संकल्पना त्यावेळी नवीन होती आणि ते एक धाडसी पाऊल होते,) मविद्यालय, मुलींसाठी वेगवेगळे कोर्सेस साठी तांत्रिक विद्यानिकेतन, टेकनीकल अशा शिक्षणाच्या सोयीसुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या..!
आजचा श्री सोमेश्वर माझा हा अभिमान माझा वाटावा असा आहे – सहकारातील आदर्शाचे प्रतीक…
ज्या कारखान्याची सुरुवात सायकलवरून फिरून शेअर्स गोळा करण्यापासून झाली होती, तोच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आज स्व दादांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग समूहात रूपांतरित झाला आहे.आधुनिक तंत्रज्ञान, उच्च साखरेचा उतारा (Recovery) आणि शेतकर्यांना मिळणारा योग्य भाव यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजला जातो..!
स्व. मुगुटराव (आप्पा) काकडे,स्व बाबालाल काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याग आणि दृष्टेपणा यामुळेच आज बारामती-पुरंदरच्या शिवारात हिरवीगार समृद्धी पाहायला मिळत आहे. हा इतिहास महाराष्ट्रातील सहकार चळवळीसाठी कायमच प्रेरणादायी राहील..!
