लोणी भापकर येथे जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला,४ जणांवर ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल..!
बारामती / वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे एका २८ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून चार जणांनी लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस हवालदार खेडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे..!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश उर्फ सोन्या जालींदर कांबळे (वय २८, रा. लोणी भापकर, ता. बारामती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास लोणी भापकर येथील बोरघाट परिसरातील सोन्या आरडे यांच्या पोल्ट्री फार्मवर घडली..!
फिर्यादी प्रथमेश कांबळे हे पोल्ट्री फार्मवर असताना आरोपी १) अभिषेक तात्या पवार, २) प्रथमेश जालींदर खोमणे, ३) महेश भापकर आणि ४) ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे (सर्व रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांनी संगनमत करून कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने प्रथमेश यांच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार केले.विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..!
या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९, ६१(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(V), ३(२)(VA), ६ आणि आर्म ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..!
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम साहेब करत आहेत..!
