मढे घाट – निसर्गाच्या कुशीत वसलेले एक रम्य आणि निवांत ठिकाण..!

0
FB_IMG_1784646377429
Spread the love

राजगड

ऑगस्ट महिना म्हटला की वर्षातील बहुसंख्य सुट्टीचा महिना. खरं तर श्रावणाची चाहूल,थुईथुई पडणारा पाऊस, निसर्गाच्या सानिध्यात भटकंती म्हणजे प्रर्वनीच.यंदा विकेंड ला लागून आलेल्या सुट्ट्या या चाकरमान्यांना नेहमीच्या रोजच्या दिनचर्येंतून स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी उत्तम ठरणार आहे. यासाठी मढे घाट हे पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. जर तुम्हाला शहराच्या गडबडीपासून आणि ग्रामीण भागात ही बऱ्यापैकी रोजच्या दगदगीतून लांब, शांततेत आणि मुख्य म्हणजे मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटपासून दूर (Digital Detox) राहून निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर मढे घाट हा एक उत्तम पर्याय आहे..!

मढे घाटाचे वैशिष्ट्य आणि आकर्षण थोडक्यात जाणून घेऊयात, 1.धबधबा आणि दरीचे विहंगम दृश्य -पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर (जुलै ते नोव्हेंबर) येथील धबधबा आणि धुक्याची शाल पाहायला खूप सुंदर दिसते.

2.ऐतिहासिक महत्त्व – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर त्यांचे पार्थिव राजगडावरून त्यांच्या मूळ गावी (उमरठ) नेताना याच घाटाचा मार्ग वापरला गेला होता. ‘मढे’ म्हणजे प्रेत; म्हणूनच या मार्गाला ‘मढे घाट’ हे नाव पडले..!

3.नेटवर्क विरहित/डिजिटल डिटॉक्स स्थान – घाटाच्या आणि आसपासच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी मोबाइल नेटवर्क नगण्य किंवा पूर्णपणे नसते. त्यामुळे व्हॉट्सॲप, कॉल्स, आणि सोशल मीडियापासून दूर राहून निवांत वेळ घालवता येतो.

4. ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंती – सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि हिरवीगार झाडी मन प्रसन्न करते..!

मढे घाटाला जाण्याचा मार्ग -मढे घाट हे पुण्यापासून साधारण ६५ ते ७० किमी अंतरावर आहे.पुणे ➔ नसरापूर फाटा (पुणे-सातारा महामार्ग) ➔ वेल्हे ➔ भट्टी – केळद गाव ➔ मढे घाट. पुण्याहून नसरापूर फाट्यापर्यंत या आणि तिथून वेल्हे गावाच्या दिशेने जा. वेल्ह्यावरून पुढे ‘केळद’ गावाकडे रस्ता जातो. केळद हे मढे घाटाच्या अगदी जवळचे शेवटचे गाव आहे..!

केळद गावातून मढे घाटाच्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता/पायवाट आहे.स्वतःचे दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जाणे सोयीचे पडते. एसटी बसने जायचे असल्यास पुण्याहून वेल्हे किंवा मडगाव/केळदकडे जाणाऱ्या बसने प्रवास करता येतो..!

मढे घाटाला भेट देताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी – केळद गाव आणि मढे घाट परिसरात मोबाइल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये आधीच कल्पना देऊन ठेवा आणि ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवा..!

केळद गावात स्थानिक ग्रामस्थांकडे किंवा छोट्या टपऱ्यांवर पिठलं-भाकरी, सोलकढी असा अस्सल ग्रामीण आणि घरगुती बेत मिळतो. पण तरीही सोबत थोडे पाणी आणि सुका मेवा/खाऊ सोबत ठेवावा..! पावसाळ्यात घाटात पाय घसरण्याची शक्यता असते. धबधब्याजवळ जाताना किंवा दरीच्या कडेला जाताना योग्य काळजी घ्या..!

मढे घाट हे एक प्लास्टिकमुक्त आणि शांत ठिकाण राहण्यासाठी कोणतीही कचरा किंवा प्लास्टिक बाटल्या तिथे टाकू नका.शांतता, हिरवळ, धुक्याची दुलई आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी मढे घाट नक्कीच एक उत्तम अनुभव ठरेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed