पणदरेच्या गिरीराज कोकरे यांची जर्मनीत उत्तुंग भरारी,MS पूर्ण करून ‘AI इंजिनिअर’ म्हणून झाली निवड..!
बारामती प्रतिनिधी
जिद्द, कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणाई जागतिक क्षितिजावर कशी गरुडभरारी घेऊ शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण बारामती तालुक्यातील पणदरे येथील गिरीराज विनायक कोकरे यांनी दाखवून दिलं आहे. जर्मनीतील प्रतिष्ठित ‘फ्रेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी, एर्लांगन’ येथून त्यांनी एम.एस. (अभियांत्रिकी) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे..!
उच्च शिक्षणासाठी थेट जर्मनी गाठणाऱ्या गिरीराज यांनी अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश खेचून आणले. केवळ शिक्षण पूर्ण करून न थांबता, त्यांनी लगेचच जर्मनीतील नामांकित ‘कोहलर ग्रुप’ (Kohler Group) मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली आहे..!
एका छोट्याशा गावातून निघून थेट जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गिरीराज यांच्या यशाने पणदरे गावासह संपूर्ण बारामती तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीमुळे परिसरातील तरुण पिढीला आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण घेण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे..!
गिरीराज कोकरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत..!
