‘मिशन सुधार’ मोहिमेचा दणका- सातारा जिल्ह्यात ५७ हजारांहून अधिक शिधापत्रिका अपात्र ठरणार ? तर बारामती तालुक्यातही प्रशासकीय हालचालींना वेग..!

0
Screenshot_20260804_182643_Google
Spread the love

सातारा/बारामती
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लब्धार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ (राईटफुल टार्गेटिंग ऑफ बेनिफिशरीज) या विशेष मोहिमेचे मोठे परिणाम समोर येऊ लागले आहेत. या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यात तब्बल ५७ हजार ३९१ शिधापत्रिका संशयास्पद व अपात्र आढळल्या आहेत..!

चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
जिल्हा पुरवठा अधिकारी वैष्णवी राजमाने यांनी स्पष्ट केले आहे की, या सर्व अपात्र लाभार्थ्यांची नावे अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येणार असून त्यांचा धान्य पुरवठा तात्काळ बंद केला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादा पेक्षा जास्त आहे किंवा जे शासकीय सेवेत कार्यरत आहेत, त्यांनी स्वतःहून आपल्या शिधापत्रिका योग्य गटात वर्ग करून घ्याव्यात. तपासणीदरम्यान चुकीची माहिती देऊन शासकीय धान्याचा लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाल्यास, अशा शिधापत्रिका रद्द करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम जिल्हा प्रशासनाने दिला आहे..!

बारामती तालुक्यातही प्रशासकीय पावले –
सातारा जिल्ह्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातही तहसील कार्यालयाकडून ‘मिशन सुधार’ कार्यक्रम अंतर्गत अपात्र लाभार्थी व शिधापत्रिकांवर कारवाई करण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. तहसील कार्यालय बारामती (पुरवठा शाखा) तर्फे ग्राम महसुली अधिकारी यांना अधिकृत पत्र काढून उच्च उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांची वार्षिक उत्पन्नाबाबतची माहिती ८ दिवसांच्या आत मंडळ अधिकारी यांच्यामार्फत साक्षांकित करून तातडीने कार्यालय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच साक्षांकित केलेली ही यादी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत..!

या मोहिमेमुळे बोगस आणि अपात्र शिधापत्रिकाधारकांचे नावे प्रसिद्ध होणार असून यामागे खऱ्या गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed