मुंबई ३.० येतंय ! महामुंबई अटल सेतू आणि विमानतळाजवळ उभं राहणार एक अत्याधुनिक आणि शाश्वत शहर..!
Baramati
मुंबई महानगर प्रदेशाचा आवाका आणि भविष्यातील विस्तार आणखी वाढवण्यासाठी ‘मुंबई ३.०’ – ‘महामुंबई’ नावाने एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि नवीन शहर उभारण्यात येत आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करणे, आधुनिक शहरीकरणाला नवी दिशा देणे आणि व्यवसायासाठी अत्यंत सक्षम व राहण्यासाठी उत्तम असे एक नवीन अर्बन सेंटर निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हे शहर पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आधारित असेल..!
या नव्या शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ तब्बल ३२३.४४ चौ. किमी एवढे असून, रायगड जिल्ह्यातील उरण, पेण आणि पनवेल या तीन तालुक्यांमधील तब्बल १२४ गावांचा यामध्ये समावेश असणार आहे. कर्नाला, साई आणि चिरनेर या भागांचा समावेश असलेले हे ‘कर्नाला-साई-चिरनेर न्यू टाउन’ मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विस्ताराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरणार आहे. या भव्य प्रकल्पाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरस्थित आंतरराष्ट्रीय ख्यातीची ‘सुर्बाना जुरोंग’ ही जागतिक पातळीवरील कंपनी नियुक्त करण्यात आली आहे..!
या नवीन शहराचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे त्याची अतिशय मोक्याची आणि थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. हे शहर अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर तसेच आगामी मेट्रो मार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरशी थेट जोडले जाणार आहे. या उत्कृष्ट दळणवळणामुळे हे शहर केवळ राहण्यासाठीच नव्हे, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक मोठे जागतिक केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे..!
