कृष्णा सातपुते : टेनिस क्रिकेटचा बादशाह वाढदिवस विशेष…!!!
बारामती
या महाराष्ट्राने भारतीय क्रिकेटला सचिन सोबतच सुनील गावसकर, झहीर खान, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवर, शार्दुल ठाकूर असे बरेच खेळाडू दिले. परंतु, क्रिकेट मधील या सर्व खेळाडूंच्या यादीसोबतच आणखीन एक नाव जगभर गाजले, ते नाव म्हणजेच टेनिस क्रिकेटचा बादशाह “कृष्णा सातपुते”.
सोलापूरच्या कुर्डुवाडी येथील मूळचा असलेल्या कृष्णा सातपुतेचा जन्म ०१/०५/१९८३ रोजी झाला. त्याच वर्षी भारताने कपिल देवच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकले होता. कृष्णाचे वडील रेल्वे मध्ये नोकरीस होते. त्यामुळे कृष्णाचे बालपण ढवळस येथील रेल्वे क्वार्टर मध्येच गेले. लहानपणापासून थोडेफार क्रिकेट खेळत होता. परंतु, नंतर नंतर त्याला शिक्षणापेक्षा क्रिकेट मध्ये जास्त रस वाटू लागला. कृष्णाने फक्त १२वी पर्यंतचेच शिक्षण पूर्ण केले आहे. तो लहान असतानाच मोठ्या मुलांमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता धुवांधार फलंदाजी करू लागला होता. याच कारणाने त्याला पुण्यातील लोकप्रिय संघ प्रतीक-११ विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. त्या मोठ्या सामन्यात त्याने प्रतीक-११ संघातील गोलंदाजांवर वर चांगलाच प्रहार केला होता. याच खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण, ज्या संघाविरुद्ध धावा काढल्या, त्याच प्रतीक ११ संघाच्या मालकांनी कृष्णाला त्यांच्या संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित केले.
एकीकडे कृष्णाचे क्रिकेट करिअर यशस्वी होऊ लागले होते, पण दुसरीकडे त्याच्या वडिलांचे कॅन्सर मुळे धक्कादायक निधन झाले. वडिलांच्या निधनाचा आईला खूप मोठा धक्का बसला व आईचे देखील त्याच महिन्यात निधन झाले. कृष्णा आई वडिलांना गमावल्यामुळे खूपच दुःखात गेला होता. वडिलांच्या उपचारांमुळे अगोदरच कृष्णा कर्जात बुडाला होता.या सर्व गोष्टी होत गेल्या तरी त्याला क्रिकेट पासून दूर राहता आले नाही. नंतर त्याने क्रिकेटकडे संपूर्ण जोमाने लक्ष दिले आणि पुन्हा आपले नाव घेण्यास क्रिकेट रसिकांना भाग पाडले ही त्याची जिद्द आणि चिकाटी होती त्यामुळेच तो आज टेनिस क्रिकेट मध्ये अव्वल आणि यशस्वी आहे…!!!
२०१९ मध्ये गोव्यातील एका मोठ्या स्पर्धेत प्रतिक-११ विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनल मध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनलला प्रतीक-११ संघाला जिंकण्यासाठी ८ षटकांमध्ये ८८ धावा करायच्या होत्या. मात्र, प्रतीक-११ चे १७ धावांतच ५ गडी बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतषबाजी केली आणि १ षटक राखून प्रतीक ११ संघ विजयी झाला.
नंतर अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत देखील कृष्णाने त्याचे नाव लीलया कमावले आहे. भारताकडून टेनिस क्रिकेट खेळताना त्याने २३ शतके ठोकली आहेत. तसेच, देशांतर्गत स्पर्धेत त्याच्या नावावर २५ पेक्षा जास्त शतकांची नोंद आहे. कृष्णाचा खेळ पाहून सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग या खेळाडूंनी देखील कृष्णाचे भरभरून कौतुक केलं आहे.
अशा या टेनिस क्रिकेट मधील रन मशीनला म्हणजेच कृष्णा सातपुते ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

