समाजसेवा व्हॉट्सॲप ग्रुपचा माणूसकी जपणारा उपक्रम,गणेश फरांदे आणि मदन काकडे यांचा सामाजिक संदेश… *
*निंबुत, बारामती
निंबुत येथील *कै. हनुमंत यशवंत आगवणे* यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मित निधन झाले. वर्कशॉपसारखा छोटा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आई, लहान भाऊ, पत्नी आणि शाळेत जाणारी दोन मुले असा त्यांचा परिवार… कुटुंबाचा ते एकमेव आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यांचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता.ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रुप सदस्य *गणेश आप्पा फरांदे* यांनी आगवणे कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्याची सूचना ग्रुपमध्ये मांडली. त्या सूचनेला *ग्रुप अॅडमिन श्री. मदन काकडे* यांनी तत्काळ सहमती दर्शवून सर्व सदस्यांना मदतीचे आवाहन केले. अतिशय अल्पावधीत ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येत तब्बल *रुपये ८०,०००* इतकी रक्कम जमा केली आणि ती रक्कम मुदतठेव स्वरूपात आगवणे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.

*मदत किती मोठी किंवा छोटी यापेक्षा ती वेळेत मिळणे महत्त्वाचे असते. आजही जगात माणूसकी शिल्लक आहे, ही भावना पीडित कुटुंबाला नव्याने जगण्याचे बळ देते.*समाजसेवा ग्रुपचा हा पहिलाच उपक्रम नाही. कोविडसारख्या कठीण काळात तसेच कोल्हापूर–कोकण भागात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटातही या ग्रुपच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक मदत तसेच वस्तूरूपी सहाय्य करण्यात आले आहे.या समाजसेवा ग्रुपमध्ये सर्व जाती–धर्मांचे, वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे सजग नागरिक आहेत. राजकीय वादविवाद, टीका–टिप्पणी सुरू असते, पण मतभेद कधीही मनभेदापर्यंत जाऊ नयेत याची काळजी सदस्य घेतात.
आपत्तीच्या वेळी मात्र सर्व मतभेद विसरून माणूस म्हणून माणसासाठी धावून येण्याची हीच खरी ओळख आहे.*या उपक्रमासाठी सूचक, अनुमोदक आणि प्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक आणि आभार.*
शब्दांकन
✍️श्री प्रसाद सोनवणे
