सोमेश्वरने केली एफ. आर. पी. वरील व्याजाची रक्कम जमा..!
दि. ६/१२/२०२५ सोमेश्वरनगर
शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे. टन इतका निघत असून संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३००/- प्र. मे. टन देण्याचे निश्चित केलेले आहे. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये दि. २९ नोव्हेंबरला वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.आजअखेर कारखान्याने ३ लाख ०१ हजार ७६० मे. टनाचे गाळप पुर्ण केले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखत ३ लाख १४ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतल्याचे यावेळी श्री. जगताप यांनी सांगितले..!
श्री.जगताप पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार गळीतास आलेल्या ऊसाची किमान आधारभूत किंमत (एफ.आर.पी.) १४ दिवसांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेबंधनकारक होते. त्यानुसार सुरुवातीच्या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसासाठी प्रथम हप्तादेणेबाबत उशीरा निर्णय झालेमुळे सदर कालावधीमधील रकमेवर १५ टक्क्याप्रमाणे देय होणारी व्याजाची रक्कम दि.२५/११/२०२५ रोजीच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सभासदांच्या खात्यावर वर्ग करणेचा निर्णय झालेला आहे..!
यामध्ये हंगाम २०२१ – २०२२ मधील रु. १ कोटी १० लाख इतकी रक्कम जानेवारी २०२३ मध्येच सभासदांचे खात्यावर वर्ग केलेली आहे. उर्वरीत हंगाम २०२२ – २०२३ मधील रु.२३ लाख ९० हजार, हंगाम २०२४- २०२५ मधील रु.४० लाख ६८ हजार व हंगाम २०२४-२०२५ मधील रु.६४ लाख ५८ हजार अशी एकूण रु. १ कोटी २९ लाख व्याजापोटीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दि. ०२/१२/२०२५ रोजी वर्ग केलेली आहे..!
राज्यामध्ये उशीरा दिलेल्या एफ.आर.पी.वरील व्याजाची रक्कम देणारा कदाचित सोमेश्वर हा एकमेव कारखाना असेल असे देखिल श्री.जगताप यांनी यावेळी सांगितले.कारखान्याने हंगाम २०२१ – २०२२ मध्ये एफ. आर. पी. पेक्षा प्र. मे.टन रु. २१८.३७ प्रमाणे जादा रु.२८कोटी ९४ लाख, हंगाम २०२२ – २०२३ मध्ये रु.४९९.५१ प्रमाणे जादा रु.६२ कोटी ७७ लाख, हंगाम२०२३-२०२४ मध्ये रु.६९७.०२ प्रमाणे जादा रु.१०२ कोटी ११ लाख व हंगाम २०२४- २०२५ मध्येरु.२२६.९४ प्रमाणे जादा रु.२५ कोटी २३ लाख इतकी रक्कम दिलेली आहे..!
सोमेश्वर कारखाना गेली ९ वर्षापासून एफ.आर.पी. पेक्षा जादा दर देत असून यावर्षीदेखिल जादा ऊस दराची परंपरा सोमेश्वर कारखाना कायम राखणार असल्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तमदादा जगताप यांनी यावेळी सांगितले..!
